भेल खालो…🔊

मला जेवण करता येत नाही, म्हणजे मी करत नाही कोणते पदार्थ. मला पाककला येत नसली तरी मला खाण्याची कला चांगली येते. बडबड न करता गपचूप जे काही केलं आहे ते खाणं ही पण एक कलाच आहे. पदार्थाला त्याच स्वतःच नाव असत तरी सुद्धा मीठ कमी, तिखट जास्त, चव नाही असं बोलून त्याला नाव ठेवली जातात. माणसं माणसाला नाव ठेवतात ते काय कमी आहे का ? माणसांनी पदार्थांना पण सोडलं नाही.🤐

माझ्याकडे पदार्थ तळायची, भाजायची काम असतात. ही काम करताना सुद्धा लक्ष नसेल तर इजा होते, हे मला चांगलच समजलं आहे. भात झालेला गरम कुकर आपण बाजूला ठेवतो आणि कोथिंबीर वडीसाठी झारा घेताना मस्त गरम कुकरला हाथ लावल्यावर लागलेला चटका पाहून रडावं की हसवत कळत नाही. समजत की पदार्थ बनवणं सोप्प नाही. लक्ष भानावर असावं लागतं.👀

कोरोनामध्ये बाहेरचं खाण बंद झालं आहे. घरी जे काही असेल तेच खावं लागत. आमच्याकडे भेळ बनवायला लागत ते समान आणून ठेवलं आहे. ज्याला हवं तसं तो भेळ बनवून खातो. सुखी भेळ, ओली भेळ, कुरमुरे शेव, चणे शेंगदाणे हा आमचा लॉकडाऊन मधला नेहमीचा संध्याकाळचा नाश्ता.🥗

घरी चिंचेची चटणी केली होती. ताई बोलली ते घालुन भेळ कर. ताईला विचारलं मी की सर्व एकत्र करून मायक्रोवेव्हला लावू की आधी कुरमुरे गरम करू ? ताईच लक्ष नव्हतं. 😑

मी भेळ करायला सुरूवात केली. सर्वात आधी कुरमुरे घेतले. त्यात चिंचेची गोड चटणी टाकली. नंतर चणे आणि शेंगदाणे टाकले. तिखट डाळ घातली. सर्व एकत्र करून घेतला आणि मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिट गरम करायला ठेवले. जेव्हा ते मायक्रोवेव्हमधून बाहेर आले तेव्हा पूर्ण भरलेला टोप अर्धा झाला होता. सर्व भेळची वाट लागली होती. त्यात पुन्हा मी थोडे कुरमुरे टाकले आणि खाण्यायोग्य करायचा प्रयोग केला.😂

मी थोडी भेळ घेतली, थोडी पप्पांना दिली, थोडी उरली होती ती ताई आणि भावला दिली. भावंडांनी पाहिल्याक्षणी विचारलं ही कोणती डिश ? मी सांगितल युनिक भेळ. ते बघितल्यावर आणि खाल्यावर जे काही टोमणे मारायला सुरुवात झाली आहे ते मी कोणता चांगला पदार्थ बनवल्यावरच थांबवू शकेन.🤕

तशी ठीक ठीक होती. इतकी पण वाईट नव्हती. मम्मीने खाल्ली नाही कारण थोडीच होती आणि आधी एकदा सुखी भेळ केली होती तेव्हा ती ताईला खायला मिळाली नव्हती. म्हणून आधी ताईला दिली. मम्मीने खाली नाही ते चांगल झालं कारण काम करायची विसरल्यामुळे शिव्या खाल्या होत्या, भेळ खाल्ली असती तर अजून शिव्या खाव्या लागल्या असता. भावाने एक चमचा भेळ खाऊन पोट भरण्यासाठी कुरकुर्याचा आधार घेतला. कुरकुरे उपाशी भावला धावून आले. तरी सुद्धा कोणाला अशा वेगळ्या पाककृती शिकायच्या असतील तर स्वतःच्या जोखिमवर माझ्याशी संपर्क साधू शकता. देवा असे नवनवीन पदार्थ बनवण्याची शक्ती मला आणि मी बनवलेले पदार्थ खाण्याची शक्ती माझ्या घरच्याना दे हीच प्रार्थना.🙏

#july2020

इंस्टाग्राम

इंस्टाग्राम हा अँप माझ्यासाठी नवीन होता तेव्हा समजून घेणं थोडं कठीण होत. सुरुवातीला तर मी अँप समजला नाही म्हणून डिलीट सुद्धा केला होता. पण परत इन्स्टॉल केला. हळूहळू समजायला लागलं. आणि आता मी दुसऱ्यांना हा अँप कसा वापरायचा ते शिकवते आहे.😎

इंस्टा अकाउंट असेल तर आपल्याला विविध अनुभव येतात. इंस्टा रिक्वेस्ट ही कोणीही कोणाला पाठवू शकतं. यामध्ये ओळखीचे आणि अनोळखी लोक सुद्धा येतात. आता रिक्वेस्ट स्वीकारायची की नाही ते आपल्यावर असत. काही काही तर इंस्टा रिक्वेस्ट गोळा करून ठेवतात. आता यामध्ये काय लॉजिक आहे हे त्यांनाच माहीत असत. नको तर स्वीकारू नका. रिक्वेस्ट गोळा करून कोणता आनंद मिळत असेल ?🤔

कधी कधी आवडत्या व्यक्तीची रिक्वेस्ट समोरून येते तर कधी आपण आवडत्या व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवतो. कधी कधी काही लोक एकदा रिक्वेस्ट डिलीट केली तरी पुन्हा रिक्वेस्ट पाठवतात. त्यांना का समजत नाही समोरचा रिक्वेस्ट डिलीट करत नसेल तर पुन्हा रिक्वेस्ट पाठवू नये. एकदा नाही दोन वेळा नाही तर तीन वेळा आणि परत परत. काय करावं अशा लोकंच…🤐

अनोळखी लोक कोणत्या निकषावर मेसेज पाठवत असतील याच कुतूहल मला आहे. काही वेळेस फक्त समोरच्याच नाव पाठवून त्यांना काय दर्शवायचं असत कोणास ठाऊक. अनोळखी व्यक्तीं बरोबर बोलणं जितकं भीतिदायक असत तितकच मजेशीर असतं. 😛

काही तर ओळखीचे पण असतात आणि अनोळखी असल्याचा भाव आणतात. आता ही युक्ती आहे. आपण ओळखत असतो तरी अनोळखी आहोत अस बोलायचं. मग आपण तुमच्याच बेस्ट फ्रेंड्सचे फ्रेंड आहोत अस बोलायचं. जेव्हा बेस्ट फ्रेंड पूर्ण गोष्टींचा खुलासा करते तेव्हा पोल खोल होते. अशा लोकांचा रागही येतो आणि हसू सुद्धा येत. दिखावा का करायचा ? समोरचा जर लक्ष देत नसेल तरी पुन्हा पुन्हा मेसेज पाठवून त्रास देणारे लोक सुद्धा असतात.😑

काही वेळेस अचानक कोणाचा एका व्यक्तीचा मेसेज येतो. आपण त्या व्यक्तीला आधी पासून ओळखत असतो. पण कधी बोलणं झालेलं नसत. अशा व्यक्तीचा मेसेज येतो तेव्हा आश्चर्य वाटत. खूप सारे प्रश्न मनात येतात. मग नंतर समजतं तो मेसेज चुकून आपल्याला केला गेला होता. तेव्हा हसू येतं. आपणही आयुष्यात असा मेसेज दुसऱ्याला केला होता आणि ते पण वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या होत्या याची आठवण होते. त्यामुळे असे प्रसंग आपण समजून घेऊ शकतो. पण अशा प्रसंगातून नवीन ओळखी होतात.🤗

एकंदरीतच इंस्टाग्रामवर वेगवेगळे लोक एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयन्त करतात. त्या प्रयत्नात सर्वच यशस्वी होतात अस नाही. काहींना नंबर मिळतो तर काहींना नाही. काही तर त्यांचे प्रयन्त चालू ठेवतात तर काही माघार घेतात. या सर्व गोष्टींमध्ये आनंद आहे. अनुभव आहेत. इंस्टाग्राम असो नसो प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधला तर आयुष्य नक्कीच सुंदर होत.❤️

कसोटी ज्ञानाची

कधी कोणते ज्ञान उपयोगात येत हे सांगता येत नाही. ज्ञान कधी वाया जात नाही. ज्ञानाचा उपयोग होत असतो. आमच्या घरात आमच्या तिघांच( मी, ताई, भाऊ) शिक्षण हे वेगवेगळ आहे. ताई सायन्सला, मी कॉमर्स, भाऊ आर्टस्.📖

आताच्या कोरोनाच्या काळात सर्व खाजगी कंपन्या बंद आहेत. सर्व घरातून काम करत आहेत. थोडाफार नोकरदार वर्ग कामावर जात आहे. या काळात नवीन नोकरी शोधणे तसे अवघड आहे. कंपनी बंद असल्यामुळे फेस टू फेस इंटरव्ह्यू घेणं शक्य नाही. इंटरव्ह्यू हा ऑनलाईनच घेतला जातो.💻

असच एक खाजगी कंपनीमध्ये ऑनलाईन इंटरव्ह्यू होता. जेव्हा मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू असतो त्यामध्ये काही लगेच निवड होत नाही. त्याचे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टीची तपासणी होते. सर्व टप्पे पार केले तर निवड होते.🙆

इंटरव्ह्यू माझा नव्हता, ताईचा होता. आधी एक दोन वेळा ऑनलाईन टेस्ट झाल्या होत्या. पुन्हा एक टेस्ट होती.या टप्प्यामध्ये कॉम्पुटरशी निगडित परीक्षा होणार होती आणि लॉजिकल प्रश्न असणार होते. ताईला त्या बद्दल जास्त माहिती नव्हती. वेळ नव्हताच. ऑनलाईन परीक्षा लगेच चालू होणार होती. मी कॉम्प्युटरचा कोर्स केला होता. बँकांच्या परीक्षा मध्ये बाकी अभ्यास होता. मला ताईला मदत करायची होती. तस कोरोनामध्ये सर्व विसरून गेली होती. मला काही आठवेल याची शक्यता कमीच होती. ताईने अभ्यास चालू केला होता. मला सर्व मस्करी वाटतं होती. मला मदत खरंच करावी लागेल वाटलं नव्हतं.🤕

परीक्षा चालू होणारच होती आणि ताईने बोलवलं. या वेळी माझ्याकडे असलेल्या ज्ञानाची परीक्षा होती. मी तर झोपे मध्येच होती. परीक्षा चालू झाली. पहिलाच प्रश्न मला येत नव्हता. उत्तर काय सांगणार मी. पुढे पुढे बघितलं. मी जो अभ्यासाचा भाग ऑप्शनला टाकते तेच होत. थोडं फार येत होतं, पण ते ताईला सुद्धा येतं होत. देवाचं नाव घेऊन काही उत्तर ठोकली होती. 😂

कितपत बरोबर किती चुकीचं मलाही समजत नव्हतं. या पूर्वी लायसन्सची परीक्षा आम्ही एकत्र दिली होती, पण त्या वेळीचा अनुभव खूपच वाइट होता. आता तसा काही अनुभव या वेळी येणार नाही अशी मी आशा करते. मी केलेली मदत, ताईने लावलेलं डोकं, भावाने दिलेला मानसिक आधार, मम्मीने थांबवलेली मस्करी या सर्वांमुळे भविष्य हे सुख देणार असेल.🙏

#July2020

बिर्यानी

गावी साखरपुडा होता. सर्व घरातले त्यासाठी जाणार होते. आम्ही पण गेलो. साखरपुडा झाला आणि रात्री बिर्याणी बनवण्याचा बेत झाला. त्यानुसार तयारी चालू झाली. व्हेज आणि नॉनव्हेज अस दोन्ही बनवणार होते. काका शेफ आहेत. त्यांच्या खाली बाकी सर्व तयारी करत होते.💁

नॉनव्हेज बिर्यानी घरच्या समोर अंगणात बनवत होते आणि व्हेज बिर्यानी घरी. काका दोन्ही कडे लक्ष देत होते. व्हेज बिर्यानीची भाजी तयार झाली होती. मला मध्ये थोडा वेळ व्हिडिओ करायचं काम दिला होत.📸

मावशीला बाळासाठी भरडी करायची होती. तिने मला व्हेज बिर्यानीची भाजीचा टोप खाली उतरवायला सांगितला. मी फडक्याने तो टोप खाली ठेवत होती. माझ्या हातून तो टोप सटकला आणि खाली पडला. माझ्यासाठी सर्व आवाज शांत झाले. काहीच ऐकू येत नव्हतं अस वाटत होतं. सर्व भाजी खाली पडली होती.😑

तितक्याच मामा आत आला त्याने बघितलं. मला विचारलं काही लागलं नाही ना, गरम नव्हता ना टोप. मला खूप वेळ काही सुचत नव्हतं. मामाने थोडी थोडी वरची भाजी उचलली. बाकी सर्व साफ केलं. मी काहीच केलं नाही. बघतच होते. हळूहळू पूर्ण घरामध्ये समजलं, मी बिर्यानीचा टोप पडला.😓

मला कोणी काही ओरडल नाही, काही बोललं नाही. पण मला वाईट वाटलं. मला समजलच नाही क्षणात काय झालं ते. पण त्या नंतर व्हेज खाणाऱ्याला चिडवत होते. मीच सॉरी बोलली. मी घरीसुद्धा कधी फडक्याने टोप उचलत नाही. पक्कड वापरते. मला वाटलं नाही, मला हे उचलायला जमणार नाही. पण चूक झाली माझी.🤕

तेव्हा पासून आता पर्यंत जेव्हा जेव्हा कोणाकडे पण बिर्यानी बनते, टोप उचलताना माझी आठवण काढतात. मला टोप उचलायला बोलवतात.😂🙈

#November2019

निष्काळजीपणा

मैत्रिणीचा वाढदिवस होता. आम्ही जवळच्या बागेत जायचं ठरवलं. मैत्रिणीला खूप सारे फोटो काढायचे होते. वाढदिवस तिचा होता. माझ्या घराच्या इथे बाईक ठरवून आम्ही बागेत गेलो. 🏡

आम्ही एका ठिकाणी बसलो. तिथे तिला गिफ्ट दिला. अजुन थोडे फोटो काढले. गप्पा मारल्या. भूक लागली होती. कुठे जेवायला जायच ते ठरवलं. पुन्हा आम्ही माझ्या घराच्या इथे आलो. जेवायला जाणारच होतो, तितक्यात मित्राने हाथ खिशात टाकला तर पाकीट नव्हतं. मी आणि तो लगेच पुन्हा बागेत गेलो. 😢

मी सँडल घातली होती आणि ती लागत होती. मी ती हातामध्ये घेतली आणि तसेच धावत गेलो. आम्ही जिथे बसलो होतो तिथे गेलो. मित्राने तिथे पाकीट काढलं होतं. पण तिथे पाकीट नव्हतं. आम्ही आजूबाजूला असलेल्या लोकांना विचारलं. तेव्हा त्यांच्या कडून समजल की तिथे एक माणूस बसला होता. आम्ही सर्वकडे पाकीट शोधात होतो. तस जास्त पैसे नव्हते. पण कार्ड्स होते. पैसे घेऊन पाकीट टाकल असेल या आशेने आम्ही पाकीट शोधत होतो.🔎

आम्ही तिथे असलेल्या पोलीसांना सांगितलं. तिथे CCTV होता. त्यांनी ऑफिसला फोन केला. आम्ही दोघेपण ऑफिस मध्ये गेलो. कॅमेरामध्ये दिसत होता. आम्ही जेव्हा तिथून निघालो त्या नंतर खूप वेळ पाकीट तिथेच होत. नंतर 2 माणूस आले. त्यांनी बघितलं ते. एक त्या खुर्ची वर बसला आणि दुसरा बाजूला. नीटआजूबाजूला बघून त्यांनी ते पाकीट घेतल. ज्या वेळी आम्ही पोहचलो तेव्हाच ते तिथून निघाले होते. अजून जरा लवकर आलो असतो तर पाकीट मिळालं असत.हे सर्व नाट्यमय प्रकरण बघुन आम्ही तिथून निघालो. 😑

तिकडच्या अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रार करायला सांगितली. तितक्यात मैत्रीण आली. आम्ही 3 पण पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तक्रार केली. 5 वाजत आले होते. आम्ही जेवलो नव्हतो. आम्ही जेवायला जायचं ठरवलं. जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. जेवून झालं आणि पैसे द्यायला मैत्रिणीने पाकीट शोधलं तर ते नव्हतंच. घाईगडबडीत ती निघताना माझ्या घराच्या इथे विसरली होती. माझ्या कडे पैसे होते म्हणून वाचलो नाही तर मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला भांडी घासावी लागली असती.😝

आम्ही माझ्या घराजवळ आलो. तिथे पर्स मिळाली. पण त्या मध्ये पैसे नव्हते. आमच्या बिल्डिंगच काम चालू होत. कदाचित त्या कामगारांनी पैसे घेतले असतील. आमची खिडकी पण बंद होती. नाहीतर कोणी ना कोणी खिडकीत असत. लक्षपण असत.👀

दोघांचपण नुकसान झालं होतं. मी तितकी वाचली होती. प्रत्येक वाढदिवस असंच काही ना काही घडलं आहे. हा वाढदिवस सुध्दा अशाप्रकारे न विसरण्यासारखा साजरा झाला होता.😂

#April2019

आज कुछ तुफानी करते है !

Lockdown मध्ये काहीतरी तुफानी करण्यात जी मज्जा आहे ना ती वेगळीच आहे. असच काही तरी अनुभव घ्यायचा मी निर्णय घेतला. एका अँपवर जवळपास मला हवं तसं असलेल्या जॉबची माहिती समजली. कॉल नंबर दिलं होता. मी विचार करू लागले. मी कॉल केलेला बंद पण केला होता. पण मग विचार केला, जवळ आहे तर ट्राय करायला हरकत नाही. मी कॉल केला. त्यांनी बायोडेटा पाठवायला सांगितला. मी लगेच पाठवला. 🤓

त्यानंतर मी काही विचार केला नाही. लगेच रात्री मला मेसेज आला, ‘उद्या इंटरव्ह्यू आहे”. वेळ आणि पत्ता दिला. मला टेन्शन आलं. घरी कसं सांगायचं. काय बोलतील. कोरोनामध्ये जॉब. असे खूप सारे विचार मनात येऊ लागले. अजून वेगवेगळे विचार मनात यायच्या आधी मी हिंमत केली आणि मम्मीला सांगितलं. 😷

मम्मीने विचार, कुठे आहे ?काय आहे ? मला वाटलं आता पुढे काही नसेल. पण तेच झालं. मम्मीच्या मनात प्रश्न. तिने मला विचारलं अर्थातच ते काळजीपोटी होत. नीट जॉब आहे ना ? उगीच कोरोना घेऊन येशील घरी. मम्मीच्या मनातल्या शंका संपत नव्हत्या. तिने ताईला सुद्धा माहिती बघायला सांगितल. त्यावर ताई रागावली आणि तिचा निर्णय तिला घ्यायला द्या अस मम्मीला सांगितल. माझ्या मनात सुध्दा वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते.🙄

दुसऱ्या दिवशी मी लवकर उठली. थोडाफार अभ्यास करायला कारण काहीच आठवत नव्हतं. तयारी करायला घेतली. पूर्ण कपाट डोळे भरून बघत होती. कोणते कपडे निवडू समजत नव्हतं. कोणते कोणते कपडे तर मी विसरून गेली होती आणि काही नवीन वाटत होते. खूप दिवसांनी आज नवीन कपडे घालणार होते. खूप भारीवाल फिलींग येत होतं. 4 माहित्यात आज पावडरच्या डब्याला हाथ लावला. तसा काय उपयोग नव्हता. मास्कची निवड केली. माझी तयारी पूर्ण झाली. तरी सुध्दा मी घरातून निघू शकत नव्हते कारण माझ्यासाठी माझी रक्षा करायला माझ्या बरोबर भावाला पाठवण्यात आलं. हा निर्णय मम्मी पप्पाचा होता. त्याची तयारी चालू होती. तो उशिरा उठला होता. चालायच्या अंतरावर असून सुध्दा इतकी काळजी वाटत होती. मी काहीही बोलू शकते नाही.😑

तसा उशीर झाला होता. आम्ही थोडा अंतर चालत आणि थोडा अंतर बसने गेलो. तस पटकन पोहचलो होतो. मी आत गेली आणि विचारलं, तेव्हा त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितल. नंतर त्यांनी बोलवलं. कठीण काही असा विचारलं नाही. पण त्यांनी मला निर्णय घ्यायला सांगितला. माझ्याकडून जर हो असेल तर ते पुढे सांगतील. घरी येऊन मम्मीने लगेच विचारलं. सर्व सविस्तर सांगितलं. मम्मीकडून होकार वाटत होता. पप्पाकडून पण वाटतं होता मला. पण मला वाटून काय. अजूनही त्याच्या मनात शंका होत्याच. आता ते स्वतः जाऊन पाहणी करणार आहेत. आता पुढे काय होईल ? मलाही माहिती नाही. कोणाचा होकार असेल ? कोणाचा नकार असेल ? 🤔

#july2020

नारळाचं झाड

आमच्या घरासमोर नारळाचं झाड आहे. त्याच्या खाली कोणी बाईक, कार ठेवत नाही, कारण नारळ पडतात आणि त्यामुळे नुकसान झालं आहे. आता पर्यंत कोणत्याही माणसाला इजा केली नाही. आम्ही आमची सर्व झाड तिथेच खाली ठेवली. पप्पा खाली झाडाच्या इथे पाणी घालायला गेल्यावर नारळ पडलेले मिळाले आहेत.🌴

सुरवातीला आम्ही जास्त लक्ष दिलं नव्हतं. पण नंतर नंतर आम्ही सुद्धा नारळ गोळा करायला लागलो. आमच्यासमोरच्या काकी सकाळी लवकर फिरायला जायच्या तेव्हा त्यांना खूप नारळ मिळायचे. कधी कधी नारळ पडल्याचा आवाज आला की सर्वात आधी त्या जाऊन आणायच्या. कधी कधी असं पण झालं होतं की कोण तरी नारळ आणायला खाली गेलं, पण त्या आधीच त्या कधी जायच्या समजायचं नाही. त्या रूम सोडून गेल्या. नारळासाठीचा स्पर्धक कमी झाला. तरी सुध्दा स्पर्धक आहे. नारळाबरोबरचे खूप गमतीदार प्रसंग आहेत. त्या मधल्या काही गमतीजमती.😁

* नारळ पडला तो ताईने बघितला होता. पण आमच्या आधी दुसरे गेले होते. लहान मुलगा आला पटकन बाहेर. त्याने बघितल. पण त्याला काही नारळ मिळाला नाही. त्याची आई आली. तिने शोधला पण नारळ मिळाला नाही. रात्र होती. दोघ पण ते घरी गेले. त्यानंतर माझा भाऊ गेला आणि नारळ घेऊन आला. तो खुर्चीच्या मागे पडला होता. तो वरून ताईने बघितला म्हणून तो मिळाला. आमच्याकडे कोणी ना कोणी खिडकीवर असतं. नंतर पुन्हा काका येऊन बघून गेले. त्यांनी आमच्या खिडकीकडे पण बघितलं. आम्ही घरातले सर्व वरून बघत होतो. नुसती मज्जाच मज्जा. 😛

* मी व्यायाम करता करता मोठा आवाज आला. मला आधी वाटलं दुसरा कसला असेल. पण नारळ पडला होता. समोरच होता, आमच्या झाडाच्या इथे. मी भावाला सांगितलं. 2 मिनिटं आम्ही बघितलं, कोणी नाही ना येत. तसा लगेच तो पटकन खाली गेला आणि तो नारळ मिळाला. कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आज. समजलं नाही वाटत नारळ पडला ते. मी सुद्धा असा नारळ पडल्यावर घेऊन आली आहे.🙈

* ताई गॅलरीमध्ये बसली होती. ताईला काही पडल्याचा आवाज आला. भावाला खाली पाठवलं. त्याने सर्व परिसर बघितला, पण काही मिळालं नाही. आवाज कसला दुसरा होता वाटत. या वेळी पचका झाला.😜

* नारळ पडलेला मम्मीने बघितला. ताई खालीच होती. भावाने ताईने फोन लावला तर लागत नव्हता. त्याने वरून ताईला हाक मारली आणि हात करून सांगितलं. पण ताईला वाटलं भाऊ बाय बाय करतो आहे. तिने सुध्दा बाय बाय केली आणि घरी येत होती. तेव्हा मम्मीने वरून सांगितलं, तेव्हा तिला समजलं. नारळ झाडाच्या इथेच होता. ताईला भावाची अकटिंग समजली नाही. त्यामुळे आता आम्ही कोड भाषा आणि कोड अकॅशन ठेवली आहे. नारळ पडला असेल तर कॉक कॉक बोलायचं म्हणजे कोणाला समजणार नाही.😂

रात्री 12 वाजता सुध्दा नारळ पडल्यावर येऊन घेऊन गेले आहेत. लगेच थोड्या वेळाने पुन्हा पडल्यावर सुध्दा त्यांनाच मिळाला आहे. आमच्याकडे रात्री उशिरा झोपतात. कदाचित ते 2 नारळ आम्हाला मिळाले असते. पण बोलतात ना, “नशिबात असेल तर मिळत” तसंच त्याच सकाळी नारळ माझ्या पप्पांना मिळाला. अजून थोडे दिवस हे असे मजेदार प्रसंग अनुभवायला मिळणार आहेत. अजून खूप सारे नारळ गोळा होणार आहेत. गोळा केलेले नारळ आम्ही परिवारामध्ये वाटले आहेत. आता फक्त प्रतिस्पर्धी वाढले नाही पाहिजेत.😜

#2017to2021

आणि ते समजल्यावर मला दुःख झालं…

कॉलेजमधून मी थेट हॉस्पिटलमध्ये गेली. मी कोणालाही सोबत घेतलं नाही. एकटीच गेली. घरी सांगितल होता, कॉलेज मधून हॉस्पिटलमध्ये जाणार. मला वेळ माहित नव्हती. मी पहिल्यांदाच आली होती या हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर 2 नंतर येणार होते. मला डॉक्टरांना भेटायचं होता. त्यामुळे मी थांबली.🕛

सुरवातीला केस पेपर काढला आणि ते घेऊन एका रूममध्ये रांगेत जायला सांगितलं. तशी गर्दी होती. मी आत जाऊन बसले. भीती वाटत होती. आता काय होणार ? कसं असणार ? काय असणार ? डॉक्टर काय बोलणार ? तसं मला माहिती होतच काय होणार ते. तेच नको होत. असे विचार मनाला त्रास देत होते.😥

मी ज्या रूममध्ये बसली होती तिथे एक मोठा आरसा होता, एक मशीन होती आणि चेक करायला एक डॉक्टर. माझा नंबर आला. मी समोर जाऊन बसली. ती मशीन होती डोळे तपासायची. एका एका डोळ्याने त्या मशीनमधल्या पॅराशूटकडे बघायचं होत. ते झाल्यावर समोर खुर्चीमध्ये बसली. मला एक लोखंडी चष्मा दिला. त्यात पुढे ग्लास बदलायला जागा होती. 👓

त्यांनी एक बाजूला नंबरची ग्लास टाकली आणि दुसरी बाजू बंद केली. समोरच्या आरशावर इंग्रजी अक्षर दिसत होती. ती वाचायची होती. मला आधी काहीच दिसत नव्हतं. नंतर ग्लास बदलल्यावर हळूहळू दिसायला लागलं. असं दोन्ही डोळ्याची तपासणी झाली. केस पेपर काही तरी लिहून मला डॉक्टरकडे पाठवण्यात आलं.📃

त्या आधी माझ्या डोळ्यात ड्रॉप्स टाकले आणि त्यामुळे मला सर्व धुरकट धुरकट दिसू लागलं. मी आत डॉक्टरकडे गेली. तिथे आधीच एक पेशंट होता. त्यांच्यावर उपचार चालू होते. ते बघून मला भीती वाटू लागली. मी डॉक्टरांच्या समोर बसली. त्यांनी केस पेपर बघियला. डोळे चेक केले आणि सांगितलं, तुला नेहमी चष्मा घालावा लागेल. त्यावर मी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली.🤓

कमी होणार नाही का नंबर ? नेहमी चष्मा घालावा लागणार ? नंबर जाणार कसा ? या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि माझं समाधान करण्याचा प्रयन्त डॉक्टरांनी केला. डॉक्टरांनी मला काही गोळ्या दिल्या आणि मी बाहेर आले. तरी सुध्दा मला धुरकट दिसत होतं. आता करायचं काय ? एकटं घरी कसं जायचं ? 😓

मी माझ्या जवळ राहणाऱ्या एका मित्राला फोन केला, पण तो घरी होता. त्याने कॉलेजमध्ये असलेल्या दुसऱ्या मित्राला फोन केला. तो टॅक्सी घेऊन हॉस्पिटल खाली आला. मी हळूहळू खाली आली आणि टॅक्सी मध्ये बसली. थोडया वेळाने मला रडायला यायला लागलं. तो मित्र विचारू लागला काय झालं ? रडते का ? रडत रडतच त्याच्या बरोबर मी बोलू लागली. आता मला मम्मी मला ओरडणार. इतका नंबर कसा ? मी लहानपणी पासून तुमची काळजी घेतली आहे. आता नेहमी चष्मा घालावा लागणार. हे सर्व मला माहिती होते. घरी आल्यावर तेच झाले. पण चष्मा लागला हे समजल्यावर रडणारी मी एकटीच असेन. तो मित्र पण कदाचित हसला असेल. काय वेडी मुलगी आहे ही. 😂🙈

#inspiredbynaina’slook❤️

#September2014

खडतर प्रवास…

लर्निंग लायसन्स तर मिळालं होतं, पण आता पर्मनंट लायसन्ससाठी अँप्लिकेशन केलं. यासाठी स्कुटी चालवून दाखवावी लागणार हे माहित होत. त्यासाठी त्याची तयारी केली होती.🙅

तो दिवस आला. आम्ही दोघीही वेळेच्या आधी पोचलो होतो. परत डॉक्युमेंट चेक करायला दिले. त्यांनी लर्निंग लायसन्स मागितला आणि ते बोलले तुम्हाला पर्मनंट लायसन्स नाही मिळू शकत. तुम्हाला परत लर्निंग लायसन्स मिळणार आहे कारण तुम्ही उशिरा अँप्लिकेशन केलं आहे. पर्मनंट लायसन्स मिळण्यासाठी लर्निंग लायसन्स मिळल्यावर 6 महिन्याच्या आत मध्ये अँप्लिकेशन करायचं असत. आम्हला ते माहिती नव्हत. आम्ही त्या नंतर अँप्लिकेशन केलं होतं.😑

आता पुन्हा लर्निंग लायसन्सची exam द्यावी लागणार होती. पण या वेळी टेन्शन नव्हतं. कारण ज्याने आम्ही फेल झाल्यावर आम्हाला असं सर्वांसमोर उभ केल होता तोच ओळखीचा निघाला होता. तो जेव्हा भेटला होता, त्याला हा किस्सा सांगितला होता. तो पण हसला होता. या वेळी त्याने लगेच पास करून दिला.🙊

परत अँप्लिकेशन केलं आणि पर्मनंट लायसन्स आता तरी मिळेल या आशेने गेलो. अँप्लिकेशन 2 चाकी आणि 4 चाकी दोन्हीसाठी होता. तशी ओळख तर होती. पण कोणतीही गोष्ट घडायच्या आधीच पूर्वकल्पना केल्या जतात तशा मी पण केल्या. स्कुटी चालवून दाखवायची असेल, असं वाटलं होतं. माझा नंबर आला तेव्हा मी गेले. तिथल्या इंस्पेक्टरने काही प्रश्न विचारले. अर्थातच ते गाडीच्या विषयी होते. मन तर आधीच घाबरले होते. तरी सुद्धा त्याचा सामना केला.💪

त्याच्या पुढे घडणार होते त्याची कल्पना मी स्वप्नात पण केली नव्हती. कार चालवून दाखवायची होती. मज्जा म्हणून सुद्धा ड्रायव्हिंग सीट वर मी कधी बसली नव्हती आणि आता थेट कार चालवायची होती. खूपच कठीण प्रसंग होता. 🤕

मी ताई आणि कार कंट्रोल करणारा माणूस असे आम्ही 3 जण कारमध्ये बसलो. अर्ध अंतर ताई आणि अर्ध अंतर मी असं चालवून दाखवायचं होता. कार कशी चालते, ब्रेक कुठे, कारचे पार्ट्स कोणते काहीही माहिती नव्हती. तरी सुद्धा अंतर पार करायचा पराक्रम मी आणि ताईने केला होता. मला तर फार आनंद झाला कार चालवून. असं अचानक कोणतेही पूर्वतयारी न करता कार चालवणे सर्वाना जमत नाही. त्याला वेगळं टॅलेंट लागत. आता मी कोणतीही कार चालवू शकते यावर शिक्का मोर्तब या प्रसंगानंतर झालं. हे असून सुद्धा किती दिवस माझं लायसन्स तिजोरी मध्ये होता. आता माझ्याकडे आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. 😝

#September2015

अपयश ही यशाची पहिली पायरी

घरामध्ये कोणालाच कोणतीही गाडी चालवता येत नव्हती. असं असताना सुद्धा नंतर शिकू शकतो या हेतूने आधी स्कुटी घेतली. स्कुटी विषयी जास्त काही माहिती नव्हती. ज्या दिवशी स्कुटी आणली त्या दिवशी मामा बरोबर एक राऊंड मारून घरी आलो. मैदानात सर्व बसले होतो. मी स्कुटीवर पुढे बसली होती. मामा माझ्या मागे बसला होता. माझा हात हँडलच्या इथे होता आणि गाडी पटकन पुढे गेली. मला समजलंच नाही. पुढे खुर्ची वर मावशी बसली होती. मामाने पटकन ब्रेक दाबला. मावशी आणि मी दोघी पण घाबरलो.😝

स्कुटी तर घेतली, पण ताईकडे आणि माझ्याकडे लायसन्स नव्हतं. फक्त पप्पांनकडे होता. लायसन्स काढायची सर्व माहिती घेऊन ऑनलाइन अँप्लिकेशन केलं. तारीख ठरवून त्या दिवशीच अँप्लिकेशन केलं. 📃

त्या दिवशी वेळेवर आम्ही पोहचलो. त्या रूम मध्ये ट्रॅफिकच्या नियमाचे प्रश्न लिहले होते. उत्तर लिहली नव्हती. आमचा नंबर येईपर्यंत आम्ही ते वाचत होतो. तशी काही जास्त माहिती नव्हती. आमचा नंबर आला. सर्व डॉक्युमेंट तपासले, फोटो काढला आणि त्या नंतर त्यांनी पुन्हा वेळ दिली. त्या वेळेत एका रूम मध्ये जायचं होतं जिथे आमची exam होणार होती.😵

Exam ? काय ? कसली ? काय असणारं ? असे खूप सारे प्रश्न, कारण असं काही असणार याची काही कल्पना नव्हती. फक्त डॉक्युमेंट जमा करायचे असतील इतकंच वाटलं होतं. 😑

जो काही थोडा फार वेळ बाकी होता त्या मध्ये पटापट सर्व प्रश्न बघून घेतले आणि exam ला गेलो. 10 प्रश्न असणार होते, 3 पर्याय होते. Exam चालू झाली. भीती तर वाटतं होती. मोठया पडदयावर प्रश्न यायला सुरवात झाली. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तरे द्यायचा प्रयत्न केला. Exam संपली. निकाल आला.😓

पासिंग गुण काही तरी होते. जे लोक फेल झाले होते त्यांची नाव मोठ्याने ओरडून त्यांना समोर बोलवत होते. मी आणि माझी ताई आम्ही दोघी पण फेल झालो होतो. असं सर्वांसमोर जाऊन उभं राहून लाज वाटतं होती आणि हसायला पण येत होता. या नंतर किंवा या आधी इतर कोणत्याही exam मध्ये फेल झालेलं ऐकलं असेल, पण लायसेन्सच्या exam मध्ये फेल होणारे आम्ही दोघी बहिणी जगाला अपयशाच एक उदाहरण झालो. 😂

त्या नंतर पुन्हा exam झाली. या वेळी पण भीती होतीच. थोडा जास्त नियम समजून घेतले. Exam दिली. या वेळी आम्ही दोघीही पास झालो. लर्निंग लायसेन्स मिळालं. ते बघून फार आनंद झाला. 😍

#January 2015